PM Narendra Modi : मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला आहे. मराठीसह पाली, आसामी, प्राकृत आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनी मोठी घोषणा केली आहे.
3 ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती.
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे.
यासोबतच ते म्हणाले की, मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.