PM Modi : मेट्रो स्टेशनबाहेर पोलिसांकडून नागरिकांवर लाठीचार्ज
मेट्रो स्टेशनबाहेर पोलिसांकडून नागरिकांवर लाठीचार्ज
पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो मार्गिका 2 अ आणि मार्गिका 7 लोकार्पण झाले आहे. अशातच मेट्रो स्टेशनबाहेर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. यावेळी पोलिसांकडून नागरिकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे.
पंतप्रधानांनी केला मेट्रोने प्रवास
पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो मार्गिका 2 अ आणि मार्गिका 7 लोकार्पण झाले आहे. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसोबत मेट्रोने प्रवास केला आहे.
पंतप्रधान मोदी गुंदवली स्थानकात दाखल
पंतप्रधान मोदी गुंदवली स्थानकात दाखल झाले आहेत. मेट्रो मार्गिका 2 अ आणि मार्गिका 7 लोकार्पण केले आहे.
'शिंदे-फडणवीस सरकारची जोडी तुमचे स्वप्न साकार करतील'
मी तुमच्यासोबत उभा आहे. हे माझे वचन आहे. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मी आलो आहे. छोट्या-छोट्या लोकांच्या पुरुषार्थाने नव्या उंचावर पोहचणार आहे. मी सर्व मुंबईकरांना विकास कार्यासाठी धन्यवाद देतो. शिंदे व फडणवीस सरकारची जोडी तुमचे सर्व स्वप्न साकार करतील हा माझा विश्वास आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी शेवटी म्हंटले आहे.
महाविकास आघाडीच्या काळात प्रत्येक कामात खोडा घातला गेला; पंतप्रधानांची टीका
भाजपाची सरकार असो किंवा एनडीएची सरकार असो. विकासाआड आम्ही येणार नाही. मुंबईत याआधी असे होताना पाहिले नाही. मधल्या काळात डबल इंजिन सरकार नसल्याने प्रत्येक कामात खोडा घातला गेला, अशी टीका पंतप्रधानांनी महाविकास आघाडीवर केली आहे. असे पुन्हा होऊ नये म्हणून दिल्लीपासून मुंबईपर्यंत मदतीची गरज आहे, असेही आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
...असे छत्रपतींच्या महाराष्ट्रात होता कामा नये : पंतप्रधान
मुंबईच्या विकासात स्थानिक प्राधिकरणाच्या मदतीची गरज आहे. फक्त पैसे योग्यप्रकारे वापरता आला पाहिजे. विकासाचे काम रोखण्याचे काम केले तर भविष्य कसे उजाडेल. विकासासाठी मुंबईकर व्याकुळ राहता कामा नये. अशी परिस्थिती बदलत्या भारतात आणि छत्रपतींच्या महाराष्ट्रात होता कामा नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे.
काही काळासाठी वेग मंदावलेला, पण... : महाविकास आघाडीला पंतप्रधानांचा टोला
येत्या २५ वर्षांत राज्यातील अनेक शहरांत भारताच्या वाढीस गती देतील. मुंबईला भविष्यासाठी तयार करणे ही डबल इंजिन सरकारची जबाबदारी आहे. २०१४ पर्यंत १० ते ११ किमी मेट्रो धावत होती. जशी डबल इंजिन सरकार बनले तसे वेग वाढला. काही काळासाठी वेग मंदावला. पण, पुन्हा शिंदे फडणवीस सरकार येताच वेग पकडला आहे, असा अप्रत्यक्ष निशाणा पंतप्रधान मोदी यांनी महाविकास आघाडीवर साधला आहे.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारत मोठी स्वप्न पाहतोय : पंतप्रधान
स्वातंत्र्यानंतर आज पहिल्यांदा भारत मोठी स्वप्न पाहत असून ती पूर्ण करण्याचे प्रयत्न करत आहे. याआधी गरिबीची चर्चा आणि जगाकडे मदत मागण्यात वेळ खर्च झाला. जगाला भारताच्या मोठ्या संकल्पावर विश्वास आहे हे प्रथमच घडत आहे. दावोसचा अनुभव शिंदे यांनी वर्णन केला. देशाबाबतइतकी सकारात्मकता का आहे? कारण भारत आपल्या सामर्थ्याचा चांगल्या प्रकारे सदुपयोग करत आहे. आज भारत जे करतोय ते समृद्धीसाठी आवश्यक आहे. आत्मविश्वासाने देश भरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने स्वराज्य व सुराज्यची भावना आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हंटले आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. तसेच मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांचे भाषण मध्येच थांबवले?
महाविकास आघाडीवर टीका करत व कामांची माहिती देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणास सुरुवात केली. परंतु, जवळपास 13 मिनीटांचे भाषण झाल्यावर मुख्यमंत्र्यांचे भाषण मध्येच थांबवण्यात आले.
तुमचा आशिर्वाद राहिला तर मुंबईच्या विकासाचा वेग वाढेल. आणि पुढील दोन वर्षात..., असे म्हणताच देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. व मुख्यमंत्र्यांनी भाषण थांबवले. यामुळे पुन्हा एकदा विरोधक शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याची संधी मिळाली आहे.
डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पांढरं करणाऱ्यांच दुकान बंद होईल; शिंदेंचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
कॉंक्रिटचे रस्ते काहींना नकोय. परंतु, लोकांना हवंय. कॉंक्रिटच्या रस्त्यांमुळे डांबरीकरणांच्या नावाखाली काळ-पांढर करणाऱ्यांची दुकाने बंद होतील. हे मुख्य त्यांचे दुखणे आहे. फक्त सहा महिन्यांमध्ये घेतलेले निर्णय सगळ्यांच्या पोटात मळमळ होत आहे. धडकी भरलीये. पुढील सहा महिन्यात एवढे काम करु शकते. तर पुढील दोन वर्षांत काय होईल. याचा त्रास त्यांना होतोय. परंतु, आपण आपले काम करु. त्यांच्या टीकेला उत्तर आम्ही कामाने देऊ. जेवढी टीका कराल. त्याच्या दहा पट काम करु, असा निर्धार त्यांनी केला आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांचे जिव्हाळ्यांचे नाते होते
बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांचे जिव्हाळ्यांचे नाते होते. हे मला सांगायची गरज नाही. हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा अभिमान हा या दोघांच्याही विचारांचा समान धागा होता. आणि विकासाचे राजकारण हा पाया होता. तेच सुत्र धरुन महत्वकांक्षी प्रकल्पाचे पुर्ण करण्यासाठी पंतप्रधान मुंबई मी आमंत्रित केले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.
'काही लोकांच्या बेईमानीमुळे डबल इंजिन सरकारला ब्रेक लागला'
पंतप्रधान मोदी सगळीकडंच लोकप्रिय आहेत जर तुनच्या लोकप्रियतेची स्पर्धा असते, तर मुंबईच पहिली आली असती. एवढे प्रेम मुंबईकरांचे आहे. 2019मध्ये तुम्ही पाच वर्षांची डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राला बदलेले आहे, असे तुम्ही म्हणाले होते. परंतु, तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून डबल इंजिन सरकार जनतेने आणली. परंतु, काहींनी बेईमानी केली. यामुळे अडीच वर्ष जनतेच्या मनातील सरकार बनू शकले नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर केली आहे.
बाळासाहेबांचे सच्चे अनुनायी एकनाथ शिंदे यांनी हिंमत दाखवली. आणि महाराष्ट्रात जनतेच्या मनातील सरकार आली. महाराष्ट्र विकासाच्या दिशेने धावू लागली, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
पंतप्रधान मोदी बीकेसी मैदानावर दाखल
पंतप्रधान मोदी बीकेसी मैदानावर दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी व्यासपीठावर भाजपचे मंत्री राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री दाखल झाले आहेत. नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, रावसाहेब दानवे, पियुष गोयल, रामदास आठवले उपस्थित आहेत. तर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे, दीपक केसरकर उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांना चाफ्याचा हार घालत स्वागत करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी पारंपरिक पद्धतीचे लेझिम वादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज मुंबईत आगमन झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक पद्धतीचे लेझिम व ढोल ताशा पथकाने स्वागत करण्यात आले आहे. तसेच, महाराष्ट्रची संस्कृती दाखवणारी वेशभूषा परिधान करून नागरिक उभे आहेत.
पंतप्रधान मोदींच्या स्वागत कमान कोसळली
पंतप्रधान मोदींच्या स्वागत कमान बीकेसी येथे कोसळली आहे. हवेमुळे ही कमान कोसळल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.
पंतप्रधानांचा मुंबई दौरा
महत्वांकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत कर्जवितरण
मेट्रो मार्गिका 2 अ आणि मार्गिका 7 लोकार्पण
बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना लोकार्पण
17182 कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे भूमिपूजन
सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दौऱ्यावर आले असून विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. बीकेसी येथे त्यांची सभाही होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत सत्ता मिळविण्याचा चंग बांधलेल्या भाजपच्या लढाईचे रणशिंग फुंकण्यासाठी पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय.