ईएसआय रुग्णालयांसाठी एमआयडीसी देणार 10 भूखंड
लोकशाही न्यूज नेटवर्क
औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना आरोग्यविषयक सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून ईएसआय रुग्णालये उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) 10 ठिकाणी भूखंड उपलब्ध करून देणार आहे.
महामंडळाचे अध्यक्ष आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री आतिथीगृह येथे एमआयडीसी 388वी बैठक झाली. राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासोबत रोजगारनिर्मिती व कामगारांना दिलासा देणाऱ्या अनेक विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली. बैठकीला उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अन्बलगन व अन्य अधिकारी उपस्थित होते.
ईएसआयच्या रुग्णालयामार्फत औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कामगारांना आरोग्यविषयक सेवा-सुविधा पुरविण्यात येतात. त्याअनुषंगाने सिन्नर, तळोजा, पालघर, जळगाव, औरंगाबाद, रायगड, रोहा, चाकण तसेच सातारा व पनवेल येथे रुग्णालयासाठी भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कामागारांना आता रजा अथवा विनावेतन रजा घेण्याची आवश्यकता भासणार नाही. याशिवाय, कोल्हापुर जिल्ह्यातील चंदगड येथे जनतेच्या हितासाठी उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरसाठी भूखंड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
'त्या' जवानांना देणार 25 लाख
महामंडळातील अग्निशमन केंद्रातील अधिकारी, कर्मचारी (वर्ग 1 ते 4) यांना आपत्कालीन प्रसंगी कर्तव्य बजावताना वीरमरण आल्यास त्यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये दिले जातील. तसेच त्यांना शहिदाचा दर्जा देण्याबाबत राज्य शासनास प्रस्ताव सादर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला.
वसुलीत 25 टक्के सवलत
कोविडच्या पार्श्वभूमीवर विविध उद्योगांकडे प्रलंबित असलेली महामंडळाची थकबाकी वसुल करण्यासाठी 25 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.