Pune District Bank; पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदेरे
प्रमोद लांडे(पुणे): राज्यात गाजलेल्या पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अनुभवी संचालक म्हणून दिगंबर दुर्गाडे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी सुनील चांदेरे यांना अजित पवार यांनी संधी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर निर्विवाद विजय मिळवला आहे. त्यानंतर बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. आज (दि. १५) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली यात पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी सुनील चांदेरे यांना संधी देण्यात आली आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 पैकी 16 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने या बँकेवर वर्चस्व निर्माण केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष पदासाठी अशोक पवार विकास दांगट आणि दिगंबर दुर्गाडे यांच्या नावाची चर्चा होती. राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवार कोणाला संधी देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले होते. दिगंबर दुर्गाडे यांनी भाजपच्या दादा फराटे यांचा दारुण पराभव केला होता.