लोकल ट्रेन प्रवासासाठी आजपासून पासेस मिळणार; रेल्वे स्थानकांवर पासेससाठी रांगा
मुंबईची लोकल ट्रेन 15 ऑगस्ट पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु होणार आहे. मात्र या लोकलमधून कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवसांचा कालावधी झालेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. या प्रवाशांचे कोरोना लसीकरण प्रमाणपत्र तपासून त्यांना पास देण्यासाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. आजपासून अनेक रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी स्टॉल सुरु करण्यात येणार आहेत.
महापालिका कार्यक्षेत्रातील कल्याण, डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली, शहाड, आंबिवली, टिटवाळा या रेल्वे स्थानकांवर तिकीट खिडकी शेजारीच महापालिकेकडून स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. आजपासून सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत हे स्टॉल्स सुरू राहणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली.
रेल्वे प्रवासासाठी पास कसा मिळवायचा?
"ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल अॅपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील", अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती.