पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू; निकालाकडे लक्ष
बहुचर्चित पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे मतदान १२ तासांचं असणार आहे. संपूर्ण राज्यात या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानं ही जागा रिक्त झाली होती.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके, भाजपकडून समाधान आवताडे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 19 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे आता कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागलं आहे.
राज्यात संचारबंदी लागू असताना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाला यातून सूट देण्यात आली आहे. निवडणुकीमुळे याठिकाणी मतदान होईपर्यंत संचारबंदी लागू नसेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. सोलापूर जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे मात्र जमावबंदीचे आदेश लागू राहणार आहेत.