'गण गणांत बोते'; संत गजानन महाराजांची पालखी आज मराठवाड्यात
हिंगोली : कोरोनाच्या (Corona Virus) दोन वर्षाच्या निर्बंधानंतर यावर्षी अनेक पालख्या पंढरपूरकडे (Pandharpur) रवाना झालेल्या आहेत. गण गणात बोते, जय हरी विठ्ठल, गजानन नामाचा जयघोष करीत श्री संत गजानन महाराजांची पालखी (Sant Gajanan Maharaj Palkhi) आज मराठवाड्यात दाखल झाली आहे.
आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक विठू माऊलीच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. या पालख्यांमध्ये विदर्भातून सर्वात मोठी पालखी संत गजानन महाराजांची असते. आज या पालखीचे हिंगोली जिल्ह्यात आगमन झाले आहे. मोठया उत्साहात ठिकठिकाणी या पालखीचे स्वागत करण्यात येत असून पालखी सोहळ्यामध्ये तब्बल सातशे वारकरी सहभागी आहेत. ही पालखी 5 जिल्ह्यातून जाणार असून तब्बल 750 किलोमीटर अंतर पार करून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचणार आहे.
वारकऱ्यांचे पांढरे शुभ्र कपडे, तुळशीच्या माळा, तुळस, कपाळावर गंध आणि अत्यंत शिस्तीत चालणारी पावलं हीच पालखीची ओळख आहे. हिंगोली जिल्ह्यात आज या पालखीचा पहिला मुक्काम सेनगाव येथे असणार असून उद्या सकाळी ही पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे. यादरम्यान वारकऱ्यांना पेयजल व खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात येणार आहे.