विद्युत जोडणी अभावी शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट पडले धूळखात
बालाजी सुरवसे | उस्मानाबाद | राज्य सरकार कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटशी दोन हात करण्याची तयारी करीत असतानाच महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिल्ह्यातील प्रकल्प होत नाही. परिणामी विद्युत जोडणी पूर्ण झाली नाही म्हणून ऑक्सिजन प्लांट धूळखात पडले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात विद्युत जोडणी अभावी शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट धूळखात पडले आहेत. कोरोनाकाळात जिल्ह्यात ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक रुग्णांचे मृत्यू झाले होते. याच अनुषंगाने जिल्ह्यातील कळंब, परंडा, तुळजापुर व उमरगा येथील शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीसाठी प्लांट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. मात्र महावितरणने कळंब व परंडा येथील प्लांटला स्वतंत्र रोहित्र बसवून न दिल्याने ऑक्सिजन निर्मितीचे हे प्लांट बंद आहेत. तसेच तुळजापुर आणि उमरगा येथील प्लांटसुद्धा योग्य विद्युत पुरवठा होत नसल्याने बंदच आहेत. एकीकडे राज्य सरकार कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटशी दोन हात करण्याची तयारी करीत असतानाच महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिल्ह्यातील लाखों रुपये खर्चून बनविलेले हे प्रकल्प अद्यापही सुरू झालेले नाहीत. महावितरण कंपनीकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे, मात्र त्यांनी अद्यापही काम सुरू केले नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितल आहे.