वर्ध्यात देठ सुकीमुळं संत्र्याची फळगळ; शेतकरी संकटात
भूपेश बारंगे | वर्धा | वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृग बहार संत्रा उत्पादक शेतकरी आहेत. दरवर्षी संत्र्यातून शेतकरी चांगले उत्पन्न घेत असतात. यावर्षी नैसर्गिक संकटांची मालिका कायमच आहे. संत्रा पिकालाही नैसर्गिक संकटांचा फटका बसत आहे. मागील काही दिवसांपासून संत्राची मोठ्या प्रमाणात फळ गळ होत आहे. उपाययोजना करूनही फळ गळ कायम असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. 25 टक्क्यांवर फळगळ झाली असून जवळपास 30 ते 40 टक्क्यांपर्यंत ही फळ गळ होण्याची शक्यता आहे. या नुकसानीने संत्रा उत्पादक शेतकर्यांची काळजी वाढलेली आहे.
कारंजा (घाडगे) तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्राच्या बागा आहेत. मृग बहाराचा संत्रा तोडणीला आला आहे. अनेक शेतात तोडणी करण्यात येत आहे. संत्रावरील खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अशा स्थितीत परिपक्व झालेल्या संत्रातील मोठ्या प्रमाणात संत्री गळून पडत आहेत. संत्रा बागेतील फळगळ शेतकर्यांना धडकी भरविणारी ठरत आहे. गळालेल्या संत्राचा सडाच बागेत पडून असल्याचे दिसते. शेतकरी गळालेला संत्रा वेचून बांधावर टाकतात. त्यामुळे शेताच्या बांधावर गळालेल्या मोठ्या संत्र्याचे ढिग पाहायला मिळतात. बागेत संत्राची फळगळ सुरू होताच शेतकर्यांनी उपायोजना सुरू केल्यात. पण, त्यानंतरही फळगळ कायमच आहे. जवळपास 30 ते 40 टक्क्यांपर्यंत ही फळगळ जाण्याची शक्यता आहे. 40 टक्क्यांपर्यंत फळगळीमुळे शेतकर्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. या फळगळीमुळे होत असलेल्या आर्थिक नुकसानीने शेतकर्यांची चिंता वाढलेली आहे. उपाययोजना करूनही फळ गळ कायम असल्याने काय करावे हे सूचतच नसून शेतकर्यांपुढे संकट कायम आहे. देठसुकीच्या प्रादुर्भावाने फळगळ होत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. याबाबत उपाययोजना केल्यात. पण, त्यानंतरही फळ गळ कायम असल्याचे शेतकरी सांगतात.
हेटीकुंडी येथील संत्रा उत्पादक शेतकरी शालीकराम क्षीरसागर यांनी, उपाययोजना करूनही फळगळ कायम असल्याचे सांगितले. देठसुकीचा प्रादुर्भाव संत्रावर असून 30 ते 40 टक्क्यांपर्यंत फळगळीने नुकसान होत आहे. उर्वरित संत्रा गळू नये, याकरिता कृषी विभागाने उपाययोजना स्पष्ट करत सरकारने मदत करावी, अशी मागणी केली.
कारंजा तालुक्यातील अनेक संत्रा बागांमध्ये अशी परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात संत्रा गळत असल्याने शेतकर्यांचे नुकसान होत आहे. त्यात उपाययोजना करूनही संत्रा गळ कायम असल्याने शेतकर्यांची चिंता वाढलेली आहे. या अनुषंगाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
कारंजा तालुक्यात सर्वाधिक संत्रा उत्पादक शेतकरी आहेत. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. देठ सुकी व बदलत्या हवामानामुळे शेतकरी हतबल झाला आहे. संत्र्यावर उपाययोजना करूनही संत्रा फळांची गळ थांबता थांबेना, यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची गरज आहे.