बांगलादेशमधील अराजकतेचा कांदा निर्यातीला फटका; राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
बांगलादेशमधील अराजकतेचा कांदा निर्यातीला फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेशच्या सीमेवर अडकले असल्याची माहिती मिळत आहे. नाशिकहून बांगलादेशला जाणारे 80 ट्रक अडकले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, बांगलादेशमध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचा फटका आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. कांदा घेऊन जाणारे ट्रक सीमेवर थांबले आहेत. तेव्हा केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन जे काही काळजीवाहू सरकार बांगलादेशमध्ये आहे त्यांच्याशी चर्चा करुन हा भारतीय शेतकऱ्यांचा विशेषता नाशिकच्या शेतकऱ्यांचा जो कांदा बांगलादेशमध्ये जातो तो रस्त्यात थांबलेला आहे. तो सुरळीत जावा यासाठी प्रयत्न करावा. अशी मी शासनाला विनंती करतो.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आजच मी पंतप्रधानांना त्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करुन हा कांद्याचा प्रश्न सोडवावा. अशी आमची शेतकऱ्यांची इच्छा आहे. असे राजू शेट्टी म्हणाले.