लसीकरणामुळे देशात पहिला मृत्यू…केंद्राचीही कबुली
देशभरात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू असतानाच एका ज्येष्ठ व्यक्तीचा लस घेतल्याने मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचं वय ६८ वर्षे होतं. केंद्र सरकारने गठित केलेल्या पॅनेलच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. लसीकरणानंतर गंभीर आजार किंवा मृत्यू झाल्यास याला वैज्ञानिक भाषेत अॅडवर्स इव्हेंट फॉलोइंग इम्यूनिझेशन (AEFI) म्हणतात. केंद्र सरकारने AEFI साठी समिती गठीत केली आहे.
या समितीने लसीनंतर ३१ मृत्यूंचे आकलन केल्यानंतर, लस घेतल्यानंतर अॅनाफिलेक्सिसमुळे (Anaphylaxis) ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. ही एक प्रकारची अॅलर्जी आहे. वृद्धाला लशीचा पहिला डोस ८ मार्च २०२१ रोजी मिळाला होता आणि काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.
AEFI समितीचे चेअरमन डॉ. एनके अरोरा यांनी लशीमुळे पहिल्या मृत्यूची पुष्टी केली आहे. परंतु, यासंदर्भात यापुढे त्यांनी काही बोलण्यास नकार दिल्याची माहिती एका वृत्त संस्थेने दिली आहे.