शिंदे गटाचे पदाधिकारी जाहीर; योगेश अग्रवाल महानगराध्यक्ष
अमोल नांदूरकर | अकोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झालेले माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आज (3 ऑगस्ट) ला जाहीर केली. शिवसेनेप्रमाणेच दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात आले असून, महानगराध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह शिवसेनेतील माजी नगरसेवकांसह काही पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. मुंबई येथे स्वतः एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार बाजोरिया व त्यांचे आमदार पूत्र विप्लव बाजोरिया यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले होते. त्यानंतर बाजोरिया यांची अकोला जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. या नियुक्तीनंतर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत उत्सुकता होती. त्यानुसार बाजोरिया यांच्यासोबत शिंदे गटात सहभागी झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती संपर्क प्रमुख म्हणून बाजोरिया यांनी बुधवारी जाहीर केली.
दोन जिल्हा प्रमुख नियुक्त करण्यात आले असून, अश्विन नवले आणि विठ्ठल सरप यांच्याकडे विधानसभा मतदासंघ विभागून जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महानगर प्रमुख म्हणून योगेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपजिल्हा प्रमुख शशिकांत चोपडे तर निवासी उपजिल्हा प्रमुख म्हणून योगेश बुंदिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इतर पदाधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही माजी आमदार बाजोरिया यांनी जाहीर केले. मुंबई येथे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या नियुक्ती जाहीर करण्यात आल्यात. यावेळी आमदार गुलाबराव पाटील, उदय सामंत, भरत गोगावले, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, विप्लव बाजोरिया, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आदींची उपस्थिती होती.
जिल्हा प्रमुखांकडे अशी असेल विभागणी
शिवसेनेने दोन जिल्हा प्रमुख नियुक्त केले आहे. त्यात प्रमाणे शिंदे गटाकडूनही दोन जिल्हा प्रमुख नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे विधानसभा निहाय्य जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. अश्विन नवले यांच्याकडे अकोला पश्चिमसह मूर्तिजापूर व अकोट विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी राहणार आहे. विठ्ठल सरप यांच्याकडे अकोला पूर्व व बाळापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.