नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी
कणकवलीतील शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी असलेले आ. नितेश राणे आणि माजी जि.प. अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांंनी जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज, 12 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीनंतरच्या न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
4 जानेवारी रोजी या दोघांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. अॅड. शुभदा खोत यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तर विशेष सरकारी वकील सुदीप पासबोला यांनी त्यांच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला होता. राणे हेच हल्ल्यामागचे सूत्रधार असल्याचा दावा करताना त्यावर भुमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास दोन दिवसांचा कालावधी द्यावा अशी विनंती न्यायालयाला केली होती. तर राणे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अॅड. नितीन प्रधान यांनी तोपर्यंत अटकेपासून दिलासा द्यावा अशी विनंती केली होती.
याप्रकरणी राज्य सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्यासाठी याचिकाकर्त्यांना मुदतवाढ हवी असल्याने न्यायालयाने सुनावणी तहकूब केली होती . तोपर्यंत नितेश राणेंवर कारवाई करणार नाही अशी हमी राज्य सरकारने न्यायालयाला दिली.