दुहेरी हत्याकांडात नऊ जणांना जन्मठेप ; हिंगोली न्यायालयाचा निकाल!

दुहेरी हत्याकांडात नऊ जणांना जन्मठेप ; हिंगोली न्यायालयाचा निकाल!

Published by :
Published on

गजाणण वाणी, हिंगोली | हिंगोली तालुक्यातील जामठी खूर्द येथे शेतीच्या वादावरून झालेल्या दुहेरी खून प्रकरणामध्ये नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. बुलबुले यांनी सोमवारी हा निकाल दिला आहे. या प्रकरणात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले.

सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहिती नुसार,जामठी खुर्द येथे अंबादास आबाजी भवर,प्रल्हाद आबाजी भवर आणि रामप्रसाद आबाजी भवर यांच्यात वडिलोपार्जित जमीनवरून वाद सुरु होता.22 जानेवारी 2016 रोजी शेत नांगरनी केल्याच्या कारणावरून पुन्हा वाद झाला. या वादाच स्वरूप बदलून हाणामारीत झालं. यामध्ये आंबादास भवर,उद्धव भवर, संजय भवर यांना कुऱ्हाड, तलवारीने मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीमध्ये अंबादास भवर व उद्धव भवर यांचा मृत्यू झाला. तर संजय भवर गंभीर जखमी झाले. या नंतर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आयोध्याबाई उद्धव राव भवर यांच्या फिर्यादी वरून 10 जणांविरोधात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आला होता.याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनंचे पो.नी.एम. एम . कारेगावकर यांनी तपास करून 10 आरोपी विरोधात दोषारोप हिंगोली जिह्वा न्यायालयात दाखल केले होते.

सदर प्रकरणात न्यायाधीश. पी. व्ही. बुलबुले यांच्या समक्ष हे प्रकरण चालविण्यात आले.त्यामध्ये सरकारी वकील एन.एस.मुटकुळे यांनी फिर्यादीच्या वतीने 18 साक्षीदारांची साक्ष जबाब घेतले होते. साक्ष जबाब झाल्या नंतर न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दुहेरी खून प्रकरणात प्रल्हाद आबाजी भवर, रामप्रसाद आबाजी भवर, आत्माराम प्रल्हाद भवर, बालाजी रामप्रसाद भवर, माधव प्रल्हाद भवर, नंदाबाई आत्माराम भवर, नामदेव दाजीबा घ्यार, विठ्ठल दाजीबा घ्यार, पार्वतीबाई माधव भवर या 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुजानबाई भवर यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com