‘टूलकिट माहितीसाठी, हिंसा पसरवणं हा उद्देश नव्हता’
लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या टूलकिट प्रकरण दररोज नवीन वळण घेत आहे. प्रजासत्ताक दिनाआधी झूम अॅपद्वारे 'पोएटिक जस्टिस फाउंडेशन'च्या बैठकीला हजेरी लावली होती, अशी कबुली वकील निकिता जेकब यांनी दिली आहे. या बैठकीला खलिस्तानी समजल्या जाणाऱ्या 'पोएटिक जस्टिस फाउंडेशन' संघटनेचे संस्थापक थालिवाल हेसुद्धा उपस्थित होते.
ग्रेटा थनबर्ग टूलकिटप्रकरणी मुंबईतील वकील निकिता जेकब यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडून अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे. याविरोधात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून निकिता जेकबनं उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. नाईक यांच्यासमोर आज सुनावणी झाली.
जेकब यांच्या वकिलांनी मुंबई पोलिसांकडे लेखी उत्तर जमा केलं आहे. हे टूलकिट एक्सिस्टंक्शन रिबेलियन इंडियाच्या स्वयंसेवकांनी तयार केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील नागरिकांना शेतकरी आंदोलन सहजरित्या समजावं यासाठी तयार करण्यात आले होते, असा दावा जेकब यांनी दाखल केलेल्या उत्तरात केला आहे.
बैठकीला हजेरी लावल्याचे त्यांनी मान्य केले असले तरी ग्रेटा यांच्याबाबतची माहिती शेअर करण्यास नकार दिला आहे. ही टूलकिट फक्त माहितीपर होते. त्याचा हिंसा पसरवण्याशी काहीच संबंध नव्हता, असा दावाही त्यांनी केला आहे.