”भाजपनं वारकरी संप्रदायाला बदनाम करू नये”
बंटी नांदुरकर | आषाढी वारीच्या नियमावली वरून राजकीय वातावरण तापत चालले आहे. यावर आता भाजपनं वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचं पाप करू नये, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांना दिले आहे.
माझी वारी माझी जबाबदारी अंतर्गत अकोला जिल्ह्यातील विश्व वारकरी सेनेचे गणेश महाराज शेटे व इतर वारकऱ्यांनी पायी वारीला सुरूवात केली आहे. शांततेच्या मार्गाने वारी करणाऱ्या २० वारकऱ्यांना पोलिसांनी लोणी काळभोर येथे स्थानबद्ध केले. या विषयावर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी 'औरंगाजेबापेक्षाही हे सरकार काळं' असल्याची तिखट प्रतिक्रिया दिली होती. यावर आता अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भाजपने वारकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचं पाप करु नये, अन्यथा वारकरी ज्या टाळान भजन करतात त्या टाळान भाजपचं टाळक शेकल्या शिवाय राहणार नाहीत, असे म्हटले. या विषयी बोलणाऱ्या तुषार भोसले यांना पावल्या खेळता येत नाहीत, फुगडी खेळता येत नाही, हरिपाठ करता येत नाही, त्यामुळे भाजपने याविषयी बोलून आग लावण्याचा प्रयत्न करू नये,असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.