जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचा उल्लेख नाही, वानखेडेंकडे पंचनामा मागा: नवाब मलिकांचा फडणवीसांवर पलटवार
मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणारे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. त्यानंतर फडणवीस यांनीही प्रतिआव्हान देत, मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, असा इशारा दिला असतानाच मलिक यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला.
सोमवारी मी जयदीप राणासंदर्भातील काही माहिती समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जयदीप राणा एका गाण्याचा फायनान्स हेड होता. कालपासून मी कुणाच्या बायकोला टार्गेट करत असल्याचं म्हटलं गेलं. मात्र, गेल्या 26 दिवसात मी कुणाची आई, बहीण आणि पत्नीचा उल्लेख केला नाही. दोन महिलांचा उल्लेख केला कारण त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध होता. जे लोक महिलांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांना मी प्रश्न विचारत आहे. दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? किरीट सोमय्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या आई-बहिणीविषयी बोलतात. किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांच्या पत्नीविषयी बोलले. एकनाथ खडसे यांच्या पत्नीला ईडी कार्यालयात जावं लागलं. किरीट सोमय्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी विषयी बोलतात. भाजपनं राजकारणाचा स्तर खालवला आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचा उल्लेख पंचनाम्यात नाही, त्यामुळे माफी मागावी, असं आव्हान नवाब मलिक यांनी दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी
देवेंद्र फडणवीस समीर वानखेडे तुमचा निकटवर्तीय आहे. त्याच्याकडून पंचनामा मागवा. माझ्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडलं नाही. मी तो पंचनामा दाखवणार आहे. 14 जानेवारीला नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याच्या बातम्या पेरल्या गेल्या. माध्यमांची फसवणूक करण्यात आली. देवेंद्र फडणवीस तुम्ही वकील आहात, तुमच्याकडं सनद आहे. एनडीपीएस कायद्याअंतर्गत सहा महिन्यात चार्जशीट फाईल करायची असते. केस कमजोर करण्यासाठी आरोप प्रयत्न करत असल्याचा आरोप होतोय, मात्र चार्जशीट झाल्यानं केस कमजोर होण्याचा प्रश्न नाही. देवेंद्र फडणवीस माफी मागणार का?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.