माजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणतात, राज्यातील सरपंच मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार
राज्यातील कोणताही सरपंच हा मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार आहे, असा दावा खुद्द माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान भाजपा खासदार नारायणे राणे यांनी केला आहे. सिंधुदुर्गमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
पुण्यामध्ये पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीने आत्महत्या केली. त्यामध्ये वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आले आहे. त्यानंतर 15 दिवसांनी माध्यमांसमोर येत राठोड यांनी, आपल्याविरोधात घाणेरडे राजकारण केले जात असल्याचा दावा केला. त्यावरून नारायण राणे यांनी संजय राठोड आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली की, तिची हत्या झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आतापर्यंत 11 ऑडियो क्लीप समोर आल्या असून तिचे आणि त्यांचे संबंध होते, असे त्यावरून दिसते. मात्र, त्यांचा तपास झाला का, हे देखील स्पष्ट झालेले नाही, असे राणे म्हणाले.
संजय राठोड हे 15 दिवस फरार होते. नंतर ते मंदिरात गेले. मंदिरात जायला ते संत आहेत का, असा सवाल त्यांनी केला. हे सरकार बलात्काऱ्यांना पाठिशी घालण्याचे काम करीत आहे. सुशांतसिंह, दिशा सालियान, पूजा चव्हाण प्रकरणातील आरोपींनाही पाठीशी घालत आहेत, असा आरोप त्यांनी केला. पोहरादेवी येथे संजय राठोड यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाबाबत राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मंत्रीच मुख्यमंत्र्यांचे ऐकत नाहीत. गर्दी जमवू नका, असे सांगितल्यानंतरही मंत्री राठोड यांनी पोहरादेवी येथे गर्दी जमविलीच. राज्यातील कुठलाही सरपंच मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार आहे. त्याला कायद्यांची जास्त माहिती आहे, असे राणे म्हणाले.