”हर्षवर्धनऐवजी मोदींनीच राजीनामा द्यायला हवा”
केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटप बुधवारी मध्यरात्री पार पडल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. हर्षवर्धन यांचा केंद्रीय आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राजीनामा द्यायला हवा होता, असा टोला नाना पटोले यांनी मोदी यांना हाणला आहे.
इंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसने आंदोलनाचा धडाका सुरू केला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढण्यात आली. भर पावसात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात केंद्रे सरकारविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. मुसळधार पावसात भिजत नाना पटोले, कॅबिनेट मंत्री सुनील केदार या सायकल यात्रेत सहभागी झाले.
यानिमित्त मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना नाना पटोले यांनी मोदींच्या मंत्री मंडळातून चांगल्या मंत्र्यांना, काम करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळाला आहे. भ्रष्ट मंत्र्यांना प्रमोशन देण्यात आल्याची टीका त्यांनी केली. ज्यांनी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करणार नाही, असं सांगणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवलं आहे.मोदींच्या ढिसाळ कारभारामुळेच हे घडलं आहे. त्यामुळे हर्षवर्धन यांचा राजीनामा घेण्याऐवजी मोदींनीच राजीनामा द्यायला हवा होता, असं पटोले म्हणाले.