Nana Patole : 'अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी काँग्रेस राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार'
मागील काही दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील ही परिस्थिती पाहता काँग्रेस नेत्यांचे पथक अतिवृष्टीग्रस्त भागातील विविध जिल्ह्यांना भेटी देऊन पाहणी करतील व त्यानंतर नुकसानग्रस्तांना भरीव मदत मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. ही मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, नुकसानग्रस्त भागातील जनतेला तातडीची मदत द्यावी यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडाने नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत द्यावी व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती प्रती हेक्टरी ५० हजार रु, व बागायती शेतकऱ्यांना १ लाख रु प्राथमिक मदत तत्काळ देण्याची मागणी केली होती. परंतु झालेले नुकसान प्रचंड मोठे असून अजून पंचनामेही झालेले नाहीत त्यामुळे काँग्रेसच्या पाहणी दौऱ्यातील नुकसानीचा आढावा अहवालानुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा केला जाईल.
राज्यातील अतिवृग्रस्त भागाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. यामध्ये विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे अहमदनगर व नाशिक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. प्रत्येक माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार, खासदार यांच्याबरोबर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे एक पथकही असणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.