टीईटी घोट्याळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींच्या नावाचा समावेश? प्रमाणपत्र होणार रद्द
चंद्रशेखर भांगे | पुणे : टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरण चांगलंच गाजलं आहे. त्यातच आता टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींची यादीच पोलिसांनी जाहीर केली होती. यात औरंगाबादचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्हीही मुलींच्या नावाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
पुणे पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या टीईटी परीक्षेत ७ हजार ८०० विद्यार्थी बेकायदेशीरपणे पास झाल्याचे उघड झाले होते. या बोगस शिक्षकांची नावे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून जाहीर करण्यात आली आहेत. त्यांना अपात्र ठरविण्यात येणार असून त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार आहे. यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या दोन्हीही मुलीचीही नावांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. हिना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी या मुलींची नावे आहेत. या दोन्हीही मुली सत्तारांच्या औरंगाबाद जिल्हातील शैक्षणिक संस्थेत कार्यरत आहेत.
सत्तारांच्या दोन्ही मुलींची नावे पुढे आल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. तर, पुणे शहर पोलीस दलाच्या सायबर पोलिसांकडून तपास सुरु असून ईडीकडून देखील या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019 मध्ये टीईटी परीक्षा घेतली होती. या परीक्षेत 16 हजार 592 परीक्षार्थीं पात्र झाले होते. प्रत्यक्षात पुणे सायबर पोलिसांनी निकाल पडताळून पाहिल्यावर 7 हजार 800 परीक्षार्थी अपात्र होते. पण शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन अधिकारी आणि खासगी एजंट यांनी संगनमत करून, अपात्र उमेदवारांकडून पैसे घेतले. याप्रकरणी अनेक उच्च पदस्थांना अटक करण्यात आली होती. तर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनेही कारवाईचा बडगा उगारला असून या 7800 विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असून त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना इथून पुढे शिक्षक पात्रता परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली आहे. बोगस पद्धतीने पात्र झालेल्यांमधील शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या या शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे.