Supriya Sule : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर; सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणाल्या...
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी 24 सप्टेंबरला मतदान पार पडलं. काल 27 सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या मुंबई सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय झाला आहे. विजयानंतर मातोश्री आणि शिवसेना भवन परिसरात मोठा जल्लोष करण्यात आला.
राखीव गटाच्या पाचही जागांवर आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. 22 सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार मात्र याला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक घेण्यात आली.
10 जागांपैकी 9 जागांवर युवासेनाचे उमेदवार विजयी झाले आहेत. एकूण 38 मतदान केंद्रावर आणि 64 बुथवर ही निवडणूक पार पडली असून या निवडणुकीसाठी 10 जागांसाठी एकूण 28 उमेदवार उभे होते.
याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणाल्या की, मुंबई विद्यापीठाच्या सीनेट निवडणूकीत युवासेनेच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविला. ही निवडणूक सत्ताधारी भाजपाकडून सातत्याने पुढे ढकलण्यात येत होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाही सत्ताधाऱ्यांनी अशाच पद्धतीने अडवून धरलेल्या आहेत. जेव्हा या निवडणूका होतील तेव्हा जनता त्यांना चोख उत्तर देईल. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.