Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक; पर्यायी मार्ग कोणता?
Mumbai: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकांवर अमेटी युनिर्व्हसिटी (साखळी क्रमांक 10.500 किमी) आणि मडप बोगदा, तसेच खालापूर पथकर नाक्यादरम्यान महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत ‘गॅन्ट्री’ बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. ‘एमएसआरडीसी’ने गुरुवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत हे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या वाहतूक ब्लॉकच्या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने (चारचाकी) शेडुंग फाटा साखळी क्रमांक किमी 08.200 येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग 4, जुना मुंबई-पुणे महामार्गावरून शिंग्रोबा घाटातून मॅजिक पॉइंट साखळी क्रमांक कि.मी. 42.000 येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील.
गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर ग्रँटी बसवण्यासाठी ब्लॉक घेतला जात आहे. त्यामुळे प्रवासी आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या ब्लॉकमुळे दुपारच्या वेळी महामार्गावर वाहनांची गर्दी होणार आहे. त्यामुळे या वेळेत प्रवासी नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे