मुंबई विमानतळाचा ‘सर्व्हर डाऊन’, प्रवाशांच्या लागल्या रांगा
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस क्रमांक दोनवर सर्व्हर डाऊन झाले. या कारणाने सर्व यंत्रणा ठप्प झाल्या होत्या. तांत्रिक बिघाड झाल्याने विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत होते. जवळजवळ ४० मिनिटे हा गोंधळ झाल्यानंतर सर्व यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात प्रशासनाला यश मिळालं. आता सर्व्हर पुन्हा सुरू झाले असून परिस्थितीत सुधारणा होत आहे.
सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे विमानतळावर प्रवाशांच्या रांगा लागून गर्दी वाढली होती. त्यानंतर सीआयएसएफने मॅन्युअल पासेस देत परिस्थिती सांभाळली. तसेच या सर्व प्रक्रियेत अधिकचा वेळ लागणार असल्याने प्रवाशांना चेक इन करण्यासाठी आणि आपआपल्या विमानांपर्यंत पोहचण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला गेला.
दरम्यान, सर्व्हर डाऊन झाल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी विमानतळ प्रशासनाने आपले सर्व कर्मचारी ‘मॅन्युअल प्रोसेस’साठी नेमल्याचीही माहिती दिली. तसेच, प्रवाशांनी या परिस्थितीत समजुतदारपणा दाखवल्याबद्दल त्यांनी आभार मानले.