धक्कादायक! एमपीएससी परीक्षाचे हॉलतिकीट सोशल मीडियावर लीक; 90 हजारांपेक्षा जास्त प्रवेशपत्र अपलोड
मुंबई : एमपीएससी परिक्षाचे 90 हजारांपेक्षा अधिक हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याने विद्यार्थी आक्रमक झाली आहेत. विद्यार्थ्यांनी तात्काळ याप्रकरणी एमपीएससी आयोगाकडे तक्रार केली आहे. याची गंभीर दखल घेत एमपीएससीने परिपत्रक जारी करत स्पष्टीकरण दिले आहे.
एमपीएससीच्या गट क आणि गट ब ची परीक्षा 30 एप्रिल रोजी होणार आहे. परंतु, याआधीच परीक्षाचे हॉलतिकीट लिक एका टेलिग्राम चॅनेलवर लिक झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. एवढेच नव्हेतर या टेलिग्राम चॅनेलने 30 एप्रिल रोजी होणाऱ्या परिक्षेचा पेपर असल्याचा दावाही केला आहे. विद्यार्थ्यांचा अनेक खासगी डाटा त्या चॅनलकडे उपलब्ध आहे. याविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले असून त्यांनी एमपीएससीकडे तक्रार दाखल केली आहे. तर ही बाब लक्षात घेऊन त्वरित यावर कारवाई करणे अपेक्षित आहे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
यावरनं तातडीने एमपीएससी आयोगाने पत्र काढून स्पष्टीकरण दिलं आहे. सदर चॅनेलवर प्रसिध्द झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लिक झालेला नाही, याची तज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे, अशी माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे. प्रवेशप्रमाणपत्रे लिक करणाऱ्या चॅनेलच्या अँडमिनविरुध्द सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यात आलेली असून प्रस्तुत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. तसेच, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच विषयांकित परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे, अशीही माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, हा प्रकार खूप गंभीर प्रकरण आहे. एमपीएससीचा डेटा हॅक करून 90 हजार मुलांचे हॉलतिकीट टेलिग्रामला टाकले आहेत. त्यांच्याकडे पुढील परीक्षेचे पेपर सुद्धा असल्याचे म्हणत आहेत. सरकारचा साहेब एवढा मोठा निष्काळजीपणा ? कोण आहे याचा सूत्रधार ? त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस पक्षाचे कार्यअध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सुरज चव्हाण यांनी केला आहे.