Navneet ravi rana
Navneet ravi rana Team Lokshahi

खासदार नवनीत राणा जे.जे रुग्णालयात दाखल

Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अजून दिलासा मिळालेला नाही. त्यातच आता नवनीत राणा (Navneet Rana) यांना स्पॉंडिलायसिस असून त्यांच्या जीवाला काही झालं तर तुरुंग अधिकारी जबाबदार असतील, असं पत्र राणांच्या वकिलांना भायखळा तुरुंग अधीक्षकांना लिहिलं होतं. त्यानंतर आज नवनीत राणांची प्रकृती (Navneet Rana Health) खालावली असून त्यांना जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

नवनीत राणा यांना स्पॉंडिलायसिसचा आजार आहे. तुरुंगात आणले तेव्हापासून त्यांना जमिनीवर झोपायला लावले आहे. त्यामुळे त्यांचा आजार बळावला आहे. आम्ही अनेकदा तपासणीची मागणी केली. पण, आमच्याकडे दुर्लक्ष कऱण्यात आले. त्यांच्या जीवाला काही झालं तर संपूर्ण जबाबदारी तुरुंगाची असेल, असं पत्र नवनीत राणांच्या वकिलांनी सोमवारी तुरुंग अधीक्षकांना दिलं होतं. तसेच या अर्जाची प्रत लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना देखील पाठविण्यात आली होती. राणांच्या वकिलांनी कोर्टात देखील या आजाराबाबत माहिती दिली होती. नवनीत राणांच्या कंबरेचं दुखणं वाढलं असून त्यांना उपचारासाठी गरज आहे, असं वकिलांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज नवनीत राणा यांना जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थान 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसा वाचणार असल्याचे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जाहीर केले होते. त्यानंतर राणा दाम्पत्य हे मुंबईत आले होते. मात्र, शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरच तळ ठोकला होता. शिवसैनिकांकडूनही राणा दाम्पत्याला आव्हान दिलं होतं. पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला होता. परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये, म्हणून पोलिसांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजावली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात त्यांना निवासस्थानाहून ताब्यात घेतलं होतं. पोलीस ठाण्यात नेल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली होती. तेव्हापासून राणा दाम्पत्य कोठडीत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com