Navneet Rana: राणा दाम्पत्यास दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्कम लांबला
खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांना आजही दिलासा मिळाला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यावेळी त्यांच्या जामीन याचिकेवर 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाच्या वतीनं राज्य सरकारला देण्यात आले आहेत. त्यानंतरच सुनावणी घेण्याची तारीख ठरवू, असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा 29 तारखेपर्यंत मुक्काम कारागृहातच असणार आहे.
राणा दाम्पत्यानं जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्यांवर राजद्रोहाच्या आरोप आहे. त्यांनी जामिनासाठी न्यायदंडाधिकारी कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र राजद्रोहाच्या आरोपांसाठी जामीन देण्याचा अधिकार दंडाधिकारी कोर्टाला नसल्याने त्यांनी ही याचिका मागे घेत सत्र न्यायालय गाठलं होतं. याआधी राणा दाम्पत्याची एफआयआर रद्द करण्याची याचिका हायकोर्टाने काल फेटाळली होती. अशातच आजच्या सुनावणीत मुंबई सत्र न्यायालयानं राणा दाम्पत्याच्या जामानीच्या याचिकेवर 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.