विद्युत तारेचा शॉक लागून मायलेकीचा दुर्देवी मृत्यू
संजय देसाई | सांगली : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या माय लेकीचा विद्युत तारेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील कुरळप या गावात सायंकाळी ही घटना घडली आहे. वंदना विश्वास माळी (वय 45) आणि माधुरी विश्वास माळी (वय 20) असे मयत मायलेकीचे नाव आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वंदना माळी या मुलगी सोबत दुपारी चार वाजेच्या दरम्यान कुरळप वशी हद्दीवरील शेतात टोकन करण्यासाठी गेल्या होत्या. टोकन करून सायंकाळी सहा वाजता उसाच्या शेताच्या बांधावरून परत घरी जात असताना विद्युत पुरवठा करणारी तार तुटून पडलेली होती. ती न दिसल्याने या तारेला माधुरी हिचा स्पर्श झाला.
शॉक लागून तार गळ्याभोवती अडकली. हे पाहून आईने तिला सोडवण्यासाठी प्रयत्न करत असताना माधुरीलाही शॉक लागला. यामध्ये दोघींचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत एका कुत्र्याचाही शॉक लागून मृत्यू झाला आहे. तर आई व बहीण अजून का घरी आली नाही म्हणून मुलगा संजीव माळी हा पाहण्यासाठी गेला. त्याला ही हाताला शॉक लागला मात्र हातात लाकडी काठी असल्याने तो बचावला.
वंदना विश्वास माळी यांचे पती विश्वास माळी यांचे पंधरा वर्षांपूर्वी निधन झाल्याने मुलगी व दोन मुलांसोबत शेतातील घरी राहत होते. माधुरी ही बीएचे शिक्षण घेत होती. आईला मदत म्हणून ती आईसोबत टोकन करण्यासाठी शेतात गेली होती. मात्र विद्युत पुरवठा अधिकाऱ्यांच्या हालगर्जी व निष्काळजी कामामुळे आज त्यांनी नाहक जीव गमवाला. सध्या वंदना यांच्या मागे संजीव व सुरेश ही दोन मुले आहेत. आई व बहिणीच्या निधनाने दोन भावांचं आक्रोश पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.