समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या मॉन्टेकार्लो कंपनीला तब्बल ३२८ कोटी रुपयांचा दंड
सचिन बडे | औरंगाबाद : मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या मॉन्टेकार्लो कंपनीला तब्बल ३२८ कोटी रुपयांचा दंड सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवल्याने मोठी खळबळ उडालीय. मुंबई ते नागपूर या ७०० किलोमीटर अंतरातील जालना जिल्ह्यातील जवळपास २५ गावांमधून हा महामार्ग जातो. त्यातील १ हजार ३०० कोटीचे काम मेसर्स मॉन्टेकार्लो कंपनीने केले. मॉन्टेकार्लो या कंपनीकडून सुरू असताना त्या कंपनीने परवानगी नसताना आणि अवैधपणे खडी, मुरूम, माती या गौण खनिजासोबत वाळूचाही उपसा मोठ्या प्रमाणात केल्याची तक्रार होती.
जालन्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ आणि बदनापूरच्या तत्कालीन तहसीलदार छाया पवार दोघांनी संयुक्तरीत्या दोन्ही तालुक्यातील समृध्दी महमार्गाची आणि जिथं अवैधरित्या गौण खनिज आणि उत्खनन केलेल्या स्थळाची पाहणी केली. यात जालना आणि बदनापूर या दोन तालुक्यात ३२८ कोटी रुपयांचे गौण खनिज हे परवानगीपेक्षा अधिकचे उत्खनन केल्याचे दिसून आले, त्यानुसार अहवाल दिला होता. त्यात जालना जिल्हाधिकारी कार्यालयांने ३२८ कोटी रुपयांचा दंड कंपनीला आकारण्यात आला होता.
समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या मेसर्स मॉन्टेकार्लो या कंपनीला दंड चुकीचा आकारण्यात आला असल्यानं दंड रद्द करावा अशा मागणीची याचिका कंपनीने औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. औरंगाबाद खंडपीठात यावर सुनावणी झाल्यानंतर खंडपीठाने कंपनीची याचिका फेटाळली होती. त्यानंतर कंपनीने पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. सर्वोच्च न्यायालयातही औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत मॉन्टेकार्लो कंपनीची याचिका फेटाळलीये. त्यामुळे मॉन्टेकार्लो या कंपनीला आता ३२८ कोटींचा दंड भरावा लागणार आहे.