मुंबई : महाराष्ट्रात मान्सून (Monsoon) आगमनाच्या घोषणेनंतर राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. राज्यात पुढील 5 दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तवली आहे. यानुसार कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पावसाच्या आगमनाकडे लागलं होतं. अखेर हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याची घोषणा केली आहे. पुढील 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, पावसाअभावी कोकणातील भात पिकाच्या पेरण्या रखडल्या होत्या. त्यांना दिलासा मिळाला असून पेरण्यांच्या कामाला वेग आला आहे. तसेच पावसाचा अंदाज घेऊन ज्या शेतकर्यांनी पेरण्या केल्या आहेत त्यांना या पावसाने दिलासा मिळाला आहे. तर दूसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतील पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.