मान्सून लवकरच बरसणार? पुढील ४८ तासात केरळात दाखल होण्याची शक्यता
पुणे : अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार झाले असल्याने याचा मान्सूनवरही परिणाम झाला आहे. नेहमी 7 जूनला हजेरी लावणारा मान्सूनला चक्रीवादळामुळे विलंब होत आहे. परंतु, हवामान विभागाने लवकरच मान्सून बरसणार असल्याचे सांगितले आहे. पुढील ४८ तासात मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) केराळत दाखल होण्याची वेळ लांबली असली तरी आता मान्सूनच्या वाटचालीस आता वेग आला आहे. पुढील ४८ तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकले आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सूनला दाखल होण्यासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहचण्याचा अंदाज असून त्यानंतर हळूहळू देशात मान्सूनचा प्रवास सुरू होणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले.