Rain Update : पुढच्या दोन-तीन दिवसांत मान्सून कोकणात तर मुंबईत...
देशाच्या बहुतांश भागात चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं आधीच व्यक्त केला आहे. त्यातच आता केरळात २९ मे रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर त्याचा महाराष्ट्राकडील प्रवास सुरू आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांना मात्र आणखी आठवडाभर मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात आहे. कर्नाटकचा आणखी काही भाग, कोकण-गोव्याचा काही भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, नैऋत्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, प.म. बंगालचा उपसागर, ई. बंगालचा उपसागर, ईशान्येमधील राज्ये, सिक्कीममध्ये पुढील 2 दिवसांत जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
दरम्यान 7 जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावर्षी तीन-चार दिवस आधीच कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. तर मान्सून 10 जूननंतरच मुंबईत येईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.