'राज ठाकरे अल्पभू-धारक शेतकरी दत्तक योजना'; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मनसे सरसावली
संजय राठोड | यवतमाळ : राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस पडला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावली असून राजसाहेब ठाकरे (Raj Thackeray) अल्पभू-धारक शेतकरी दत्तक योजना सुरु केली आहे.
वणी, मारेगाव आणि झरीजामनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेऊन खरिपाची लागवड केली. सुरुवातीला पाणी न आल्याने दुबार पेरणी करावी लागली. तर आता अतिवृष्टी झाल्यामुळे नदीला पूर येऊन शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांवर असमानी आणि सुलतानी अशी दोन्ही संकटे ओढावली आहेत. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे सरसावली आहे. राजसाहेब ठाकरे अल्पभू-धारक शेतकरी दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे.
यानुसार पुरामुळे ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना रब्बी हंगामात उभारी मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे या भागातील जवळपास 600 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे, खते, कीटकनाशके, यासह इतर शेतीसाहित्य शेतकऱ्यांना घरपोच नेऊन देण्यात येणार आहे.