राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया नको; ओवैसींचे MIM नेत्यांना आदेश
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल शिवाजी पार्कवर गुडीपाडव्या निमित्त आयोजित मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी राज ठाकरे काय बोलणार यावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. आपल्या भाषणात राज ठाकरेंनी पुन्हा कट्टर हिंदुत्वादी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. मशिदीवरचे भोंगे हटवा अन्यथा हनुमान चालिसा वाजवू असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाद्दुल मुस्लमीन (AIMIM) पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी यावर आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
असदुद्दीन ओवैसी हे आक्रमक भूमिका घेतील अशी शक्यता होती, मात्र आता त्यानंतर त्यांनी घेतलेली भूमिका ही चर्चेचं कारण ठरतेय. राज ठाकरे यांच्या भोंग्याविरोधातील वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, कोणतीही चर्चा त्यावर करू नये असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. तसे आदेशच त्यांनी सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे नेमकं एमआयएमचं म्हणणं काय आहे हे समजू शकलेलं नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कमध्ये गुडी पाडवा मेळावा घेतला. पुण्यात पक्षाच्या वर्धापनदिनाच्या सभेतच त्यांनी आपल्या या मेळाव्याबद्दची घोषणा केली होती. त्यामुळे ते या सभेत काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं. त्यांनी काल आपल्या भाषणात राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली.