Mumbai Megablock: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी असलेला रेल्वे मेगाब्लॉक रद्द करा; वर्षा गायकवाड यांची मागणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी असलेला रेल्वे मेगाब्लॉक रद्द करा अशी वर्षा गायकवाड यांनी मागणी केली आहे. आंबेडकरी अनुयायांना चैत्यभूमीला येण्यात अडचण होऊ शकते म्हणून उद्याचा रेल्वे मेगाब्लॉक रद्द करा.
मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेने रविवार दिनांक 14एप्रिल 2024 रोजी दोन्ही मार्गावर लोकलचा मेगाब्लॉक घेणार असल्याचे जाहीर केले आहे. याच दिवशी राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. मेगाब्लॉक ठेवल्याने कोट्यवधी आंबेडकरी अनुयायांना चैत्यभूमीला येण्यात अडचण होऊ शकते. रेल्वेने याचा विचार करून रविवारचा मेगाब्लॉक रद्द करावा, अशी मागणी मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दिनांक 14 एप्रिल रोजी जयंती आहे. दरवर्षी देशभरातील लाखो आंबेडकर प्रेमी, बाबासाहेबांवर, त्यांच्या विचारांवर श्रद्धा असणारे लोक मुंबईतील दादर चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यास येत असतात. परंतु याच दिवशी रेल्वे मेगाब्लॉक घेत असल्याने देशभरातून मुंबईतील चैत्यभूमीवर आंबेडकरांना अभिवादन करण्यास येणाऱ्या अनुयायांना नाहक त्रास होत आहे. रेल्वेने याची दखल घेऊन रविवार 14 एप्रिलचा मेगाब्लॉक रद्द करून तशा सुचना प्रसिद्धी माध्यमांकडे द्याव्यात व रेल्वेच्या माध्यमातून उद्घोषणा करावी असेही वर्षाताई गायकवाड म्हणाल्या.