मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी नाकारली परवानगी
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या वेशीपर्यंत आला आहे. अवघ्या काही तासांत ते मुंबईत दाखल होणार होते. 26 जानेवारी रोजी आझाद मैदानात धडक देऊन जरांगे उपोषण करणार आहेत. परंतु, जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. याबाबतचे पत्रही जरांगेंना देण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणासाठी आझाद मैदानात परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर येऊन थांबले आहेत. पण त्याआधीच मुंबई पोलिसांनी पत्र लिहून आझाद मैदानावरील उपोषण करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं. तर, उपोषणासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान जरांगेंना सुचवलं आहे.
दरम्यान, वाशीपासून मुंबईपर्यंत चालत जावून आमरण उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगेंनी सभेत जाहिर केले होते. आम्ही मुंबईला शांततेत जाणार, शांततेत बसणार आणि आरक्षण घेणार आहे. आम्ही कोणतीही गडबड करणार नाही असा शब्द मी सरकारला देतो, असेही त्यांनी म्हंटले आहे. तसेच, रॅलीत कोण गडबड करत असेल तर लक्ष ठेवा, असे आवाहनही जरांगेंनी केले होते.