मराठ्यांच्या नादी लागू नका, 24 तारखेपर्यंत वेळ; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
राजगुरुनगर : सरकारकडून मराठ्यांची फसवणूक होते आहे. मराठ्यांच्या नादी लागू नका. तुमच्याकडे 24 तारखेपर्यंतचा वेळ आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. तसेच, आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धारही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील राजगुरूनगरमध्ये जरांगेंची जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
मराठा समाजातील एकाने आत्महत्या केली. मराठा समाज सुनील कावळेंचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्याच्या लेकराला मराठा समाज कधीच माया कमी पडू देणार नाही. आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप मनोज जरांगेनी केला आहे.
तसेच, कुणीही आत्महत्या करायची नाही, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. आरक्षण वेळेत दिलं असतं तर आत्महत्या झाल्या नसत्या. सरकारनं विशेष अधिवेशन बोलावून कायदा पारित करावा, अशी मागणीही जरांगे पाटलांनी सरकारकडे केली आहे.
मी मरेपर्यंत मराठा समाजांशी गद्दरी करणार नाही. माझ्या जातीला न्याय देण्यासाठी मी उभा आहे. 24 तारखेपर्यंत काही बोलणार नाही. 22 ऑक्टोबरला पुढची दिशा ठरणार आहे. उद्रेक करायचा नाही. उद्रेक केला तर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे आपण शांततेने आंदोलन करायचे आहे. उग्र आंदोलन करायचे नाही, असेही मनोज जरांगेंनी स्पष्ट केले आहे.