मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी आमदाराचं घर पेटवलं; जरांगेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले...
जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं असून त्यांची प्रकृती खालावत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातच, बीडच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. तर, गाड्याही पेटवल्याचे समोर येत आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर येत आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, प्रकाश सोळंके काहीतरी बोलला असेल म्हणून जाळला असेल, तो काहीतरी बोलल्याशिवाय मराठे वाटेला जात नाहीत. तो खूप खोडील आहे. आधी माझा मराठा असं करूच शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जर तेथील मुलांवर कारवाई झाली तर मी आग्या मोहोळ घेऊन येईल, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला असून कुणीतरी आमच्या आंदोलनाला गालबोट लावत असल्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
त्यांचे वाचाळवीर काहीतरी बोलत असतील. त्यांचे लोकं बळच म्हणतात की फोडायचं का? तुम्ही आडवं बोलले तर हे खवळतात. त्यामुळे काहीही बोलून खवळून देऊ नका, असे जरांगे पाटलांनी म्हंटले आहे. तसेच, केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याशिवाय क्युरेटीव्ह पीटिशन दाखल होऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.