आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जरांगे भूमिकेवर ठाम
जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालवत असल्याने मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत आहे. या पार्श्वभूमीवर कुणबी नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अशात, मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कुणबी असल्याचे पुरावे सापडले असतील, ज्यांना पुरावे त्यांना आरक्षण असे नाही तर सरसकट प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मानोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मराठा एक आहे, ज्यांचे सापडले त्यांना देत असाल तर ते घेणार नाही. अर्ध्यांना द्यायचं आणि अर्ध्यांना द्यायचे नाही असे असेल तर मी आंदोलन थांबवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील सरसकट मराठयांना आरक्षण द्या, असा पुनरुच्चार पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी केला आहे.
सरकारला आणखी मुदत देणार का, असे विचारले असता ते म्हणाले, थोडा वेळ म्हणजे थोडा किती? यांचं थोडं म्हणजे चाळीस-चाळीस वर्षे आहे, अशी टीकाही जरांगे पाटलांनी केली. मुख्यमंत्री यांनी सांगितले असते तर पंतप्रधान बोलले असते. पण, त्यांनी सांगितले नाही. तसेच, केंद्र सरकारने हसतक्षेप केल्याशिवाय क्युरेटीव्ह पीटिशन दाखल होऊ शकत नाही. त्याचा पुनर्विचार करायचं की नाही हे कोर्ट ठरवेल. समितीकडे असणारे हजारो पुरावे न्याय द्यायला खूप आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.
आरक्षण मिळेल तर ठिक मात्र आंदोलन थांबणार नाही. आतापर्यंत शांततेचे आंदोलन पाहिले आहे, पुढचा टप्पा खूप अवघड आहे. आणखी ६ टप्पे बाकी आहेत. आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही. २ नोव्हेंबरला तिसरे चरण सुरु होणार, अशी घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली आहे.