मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जरांगे पाटील उपोषण मागे घेणार? म्हणाले, उद्या...
मुंबई : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आज नववा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे. याप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून महसुली, शैक्षणिक व संबंधित नोंदी तपासून मागणीनुसार निजामकालीन ‘कुणबी’ नोंद असणाऱ्या मराठा समाजास ‘कुणबी’ दाखले देण्याबाबत अहवाल तयार सादर करणार असल्याची माहिती शिंदेंनी दिली आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेनंतर सरकारचे शिष्टमंडळ अर्जुन खोतकर आणि राजेश टोपे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यानंतर जरांगे पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आम्ही सगळे चर्चा करणार असून सकाळी 11 वाजता निर्णय कळवणार आहोत. समाजाचा निर्णय घेताना पारदर्शक घ्यावा लागेल नाहीतर मला शेण खावं लागेल. कुणबी प्रमाणपत्राचा जीआर हवाय. आम्ही विचार करून सकाळी 11 वाजता कळवतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. यामुळे मनोज जरांगे पाटील उद्या काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. या उपोषणामुळे जरांगे पाटलांची तब्येत खूप खालावली आहे. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना 2 सलाईन लावली आहेत. त्यामुळे त्यांच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. जरांगे पाटलांच्या कुटुंबियांनीदेखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे.