पंतप्रधान मोदींना विनंतीची हाक दिली, मात्र...; जरांगे पाटलांची टीका, त्यांना गरिबांची गरज नसेल
जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून पुन्हा उपोषण सुरु केले आहे. आम्ही सरकारला ताळ्यावर आणणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटले आहे. यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. आम्ही मोदींना विनंतीची हाक दिली, मात्र त्यांना गरीबांचे घेणे-देणे नाही, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही नरेंद्र मोदी यांना विनंतीची हाक दिली, आम्ही 5 ते 6 दिवस हाक दिली. मात्र, त्यांना (मोदींना) गरीबांचे घेणे-देणे नाही. मात्र त्यांनी राज्य सरकारला पंतप्रधानांनी कॉलही केला नाही. मोदींना वेळ नसेल, त्यांना गरिबांची गरज नसेल, असे त्यांनी टीका केली.
पण, आम्ही मराठा आरक्षण मिळवणार आहोत. सर्वात मोठा समाज असताना आमच्यावर अन्याय झाला. आरक्षण मिळाल्याशिवाय समाज थांबणार नाही. आजपासूनच कडक आमरण उपोषण सुरू झालं. दुसऱ्या टप्प्यातील हे आंदोलन सरकारला पेलणार नाही. कळेल त्यांना शांततेचे युद्ध किती जेरीस आणते, असा इशाराच मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आहेत. याबाबत मनोज जरांगेंना विचारले असता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठा आरक्षणासाठी गेले असतील तर चांगली गोष्ट आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
पंजाबराव देशमुख यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कायदा पारित केला तो सरकारनं पहावं आणि आरक्षण द्यावं. पुरावे वाचण्यात आमचं आयुष्य घातलं आणि तुमचंही आयुष्य घातलं. मी टीका करत नाही. पण, आम्ही लढायला सज्ज झालो, करोडो मराठे रस्त्यात उतरले आहेत. आम्ही सरकारला ताळ्यावर आणणार, असा निर्धार जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे.