मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार; विधानसभा अध्यक्षांचे आदेश
मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळालं. यावरुन आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून विधानसभेत हल्लाबोल केला आहे.
आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा जरांगेंनी केली. कटकारस्थानाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. मराठा समाजाची बदनामी केली जात आहे. जरांगेंची भाषा चुकीची. जरांगेंनी भाषा नीट वापरावी. तुला निपटून टाकू, अशी भाषा जरांगेंनी वापरली. मुख्यमंत्र्यांना शेवटची संधी असही जरांगे म्हणाले. धमकी देण्याचं बळ जरांगेंना कुणी दिलं. छगन भुजबळ यांनाही धमक्या दिल्या.
कुठल्याही समाजाला नख न लावता मराठा समाजाचे हित जपले पाहिजे, ही भूमिका सर्वांची आहे. आंदोलनात जेसीबी, दगड कोणत्या कारखान्यातून आणले? जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात एसआयटी चौकशी करा. मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे कोण याची चौकशी करा. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे. अशी आशिष शेलार यांनी मागणी केली आहे. यावरुनच आता विधानसभा अध्यक्षांनीही याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.