मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकर भरती नको; जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी
मुंबई : ज्या मराठ्यांना कुणबी दाखला मिळणार नाही किंवा कोर्टात रद्द झालेलं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व मराठा विद्यार्थ्यांना केजीपासून पीजीपर्यंत मोफत शिक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत नोकरभरती केली जाऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली. नोकरभरती करायची असेलच मराठ्यांसाठीच्या जागा शिल्लक ठेऊन नोकरभरती करावी असंही जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयात आहे. तर १०० टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणात १०० टक्के मोफत शिक्षण करण्यात यावे. मुलींना केजी ते बारावी मोफत शिक्षण असे त्यांनी सांगितले आहे. मोफत शिक्षणाचा निर्णय आजच घ्यावा. जिल्हास्तरावर वस्तीगृह मागणी केली होती ही जुनीच मागणी आहे. त्याबाबत ते निर्णय घेतो बोलले पण आदेश काढला नाही.
तसेच, हे आरक्षण मिळेपर्यंत क्युरेटिव्ह पिटिशनमार्फत व सगेसोयरे मिळेपर्यंत सरकारी भरती करायच्या नाहीत. मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवून भरती करा. पण आमच्या जागा सोडा, अशीही मागणी त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने नियुक्ती रखडलेल्या उमेदवारांना एसईबीसीमधल्या उमेदवारांना १५१३ पदे निर्माण केली आहे. ४ हजार ७७२ उमेदवारांना नियुक्ती देण्यात येत आहे. इतर प्रवर्गातील नोकरभरतीला मराठा समाजाचा विरोध नसेल. पण, मराठ्यांसाठीच्या जागा शिल्लक ठेऊन नोकरभरती करावी, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं.
आमची अशी इच्छा आहे की आजच्या रात्रीत आम्हाला अध्यादेश द्यावा. त्यावर सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. तरीही माझं म्हणणं आहे की अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत द्या, रात्रीतून द्या. २६ जानेवारीचा आणि कायद्याचा आम्ही सन्मान करुन आम्ही आजची रात्र इथेच काढतो, अशी घोषणा त्यांनी केली आहे. मात्र, अध्यादेश दिला नाही तर उद्या आझाद मैदानावर जाणार म्हणजे जाणार असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आरक्षण घेण्यासाठी आलो आहे. मला अध्यादेश पाहिजे. गुन्हे मागे घेण्याचे पत्र पाहिजे. अध्यादेश नाही दिला तरी आझाद मैदानावर जाणार. अध्यादेश दिला तर गुलाल उधाळायला आझाद मैदानावर जाणार, असेही मनोज जरांगेंनी म्हंटले आहे.