मराठा आरक्षणासाठी आज महत्वाची बैठक; जरांगे पाटील म्हणाले...
जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज १४ वा दिवस असून त्यांची प्रकृतीही खालावली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अशातच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी सर्वपक्षीय बैठक होणार असल्याची माहिती दिली आहे. यावर मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून आमच्यावर का? असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, दुसऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून आमच्यावर किती अन्याय करतील. आमच्याकडे पण बघा. ओबीसीवर देखील अन्याय करू नका आणि आमच्यावर पण अन्याय करू नका. आम्हाला आरक्षण पाहिजे सरसकट, भिजत घोंगडे ठेऊ नका. जे काही करायचं ते करा, आरक्षण द्या.
सर्व पक्ष आता एकत्र येत आहेत. आता किती आम्हाला साथ देतात आणि काम करतात. किती खोटं आहे का प्रेम आहे हे आज उघड होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही एकत्र येणार आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
माझ्या समाजाची जी वेदना आहे. तीच माझी वेदना माझं उपचार म्हंजे मराठा आरक्षण. माझ्या समाजाची लेकर अडचणीत आहेत, मराठ्यांच्या लेकरांची शान वाढवावी संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय. मुख्यमंत्री सांगतात समजून सांगू. बघू येतील ते समजून सांगतील. फक्त चर्चा करण्यासाठी येतात तुम्ही ऐकत नाही, तुम्ही पत्र घेऊन येतात का? मग मी का ऐकू? माझा उपचार मराठा आरक्षण आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहणार आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.