Maharashtra SSC Results 2021 : अखेर शिक्षण मंत्र्यांची दिलगिरी, दोषींवर कठोर कारवाई करणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 चा निकाल जाहीर करण्यात आला. मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल अनेक अडचणींनंतर जाहीर झाला. मात्र दुपारपासून शिक्षण मंडळाची वेबसाईट क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी अडचणी आल्या. यावर आता शालेय शिक्षणमंत्री यांनी दिलगिरी व्यक्त करत दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली करणार असल्याचं सांगितलं आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडवरुन ट्विट करत याची माहिती दिली आहे.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी दिलेल्या दोन्ही वेबसाईट दुपारी एक वाजल्यापासून जवळपास सहा तास डाऊन होती. निकालाच्या वेबसाईट कधी पूर्ववत होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे. वेबसाईट डाऊन का झाल्या, याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
दरम्यान, यावर शिक्षणमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आज काही तांत्रिक बाबींमुळे शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दहावीचा निकाल प्राप्त होण्यास अडथळे निर्माण झाले. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. सदर प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल; जेणेकरून घडल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.