राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्यात लवकरच २० हजार पदांची पोलिस भरती होणार आहे. गृहमंत्रालयाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून आम्ही पोलीस भरतीबाबत निर्णय घेतला आहे. राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार आहे. 8 हजार पदांसाठी जाहिरात देण्यात आली असून लवकरच आणखी 12 हजार पदांची जाहिरात लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडलेल्या विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गृहखात्याची बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर फडणवीस यांनी पोलीस दलाला सूचना दिल्या आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण वाढविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
मागच्या अनेक महिन्यांपासून राज्यातील लाखो तरुण पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत होते. काही दिवसांपूर्वी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. सरकारने तातडीने रिक्त पदांची भरती करावी, या मागणीसाठी तरुणांनी नांदेडमध्ये फडणवीस यांना घेराव घातला होता. आता अखेर सरकारने या भरती प्रक्रियेबाबत मोठी घोषणा केली आहे.