महाराष्ट्र
2022 सेलिब्रेशन प्लॅन करताय? राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर
राज्यात ओमिक्रॉनप्रमाणे कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहेत. आतापर्यंत राज्यात १६७ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. येत्या काळात ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वेगाने पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने नववर्षाच्या सेलिब्रेशनचा पार्श्वभूमीवर मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत.
राज्य शासनाने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यु लावला आहे. त्यामुळे यंदाचा नववर्ष साजरे कसे करावे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्या संदर्भात आता राज्याच्या गृहखात्यानं एक नियमावली जाहीर केली आहे. त्यात सर्व नियम देण्यात आले असून नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे असे आवाहन करण्यात आले आहेत.
- खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना……
- ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी दरम्यान नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच साधेपणाने नववर्षाचे स्वागत करावे.
- २५ डिसेंबरपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यात बंदी घालण्यात आली आहे, या आदेशाचे पालन करावे.
- ३१ डिसेंबरला नववर्षाच्या स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृह उपलब्ध आसनक्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत, तर खुल्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्क्यांच्या मर्यादेत उपस्थित राहण्याची परवानगी असेल.
- तसेच ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तेथे कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षांवरील नागरिकांनी आणि दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या, आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे.
- ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करताना सोशल डिस्टन्सिंग राहिले, तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
- मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी इत्यादी ठिकाणी देखील नागरिकांनी गर्दी करू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.
- नववर्षाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या धार्मिक/ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये. तसेच मिरवुणका काढू नये.
- अनेक जण नववर्षाच्या सुरुवातीला धार्मिक स्थळी जातात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि आरोग्य, स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून खबरदारी घ्यावी.
- फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.
- कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगर पालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील.