राज्यात पुन्हा निर्बंध! नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवरही बंधने; आज नवी नियमावली
महाराष्ट्रासह देशात वाढत चाललेल्या कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले आहेत. राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार हे काल निश्चित झालं आहे. त्यानुसार आज, शुक्रवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार असून, याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येईल.
राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आज 24 रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले आहे.
याबाबत शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री पुन्हा करोना कृतीदलाशी आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी राज्यात नवे निर्बंध लागू करण्याची घोषणा करण्यात येईल. या निर्बंधांनंतर आठवडाभर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून परिस्थितीनुसार निर्बंध कठोर करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.