Uddhav Thackeray : उद्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत म्हणाले...
बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्याचा बंद हा विकृती विरुद्घ संस्कृती या करता हा बंद आहे. अनेकजणांना असं वाटतंय बहुतेक सगळ्याच महिलांना आणि पालकांना असं वाटते आहे की, आपली मुलगी शाळेमध्ये सुरक्षित राहिल का? अनेक माता भगिनींना वाटते आहे की, कामाच्या ठिकाणी आपण जातो कार्यालय असतील, रुग्णालयं असतील इथं आपण सुरक्षित राहू का? त्याच एकूण अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद जसं सरकार म्हणते की विरोधी पक्षाने होय आम्ही विरोधी आहोत. आम्ही विरोधी या विकृतीचे आहोत. त्यामुळे उद्याचा बंद हा विकृतीच्या विरोधकांनी केलेला बंद आहे. विकृती विरुद्ध संस्कृती असा हा उद्याचा बंद असणार आहे. जसं आजपर्यंत आम्ही बंद करत आलेलो आहोत. उद्याचा बंद हा महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांतर्फेच नव्हे तर सगळ्या नागरिकांच्यावतीने आम्ही करतो आहे. त्याच्यामुळे सगळे नागरिक यामध्ये सहभागी होतील. जात, पात, धर्म, भाषा, भेद, राजकीय पक्ष या सगळ्या कक्षा ओलांडून सगळ्यांनी त्यात सहभागी व्हावं ही माझी त्यांना विनंती आहे. हा शेवटी सामाजिक प्रश्न आहे. या बंदमध्ये आजपर्यंत असे बंद झालेलं आहेत. तसाच उद्याचा बंद राहिल. कडकडीत बंद असायला पाहिजे. मात्र त्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या चालू राहतील. एकूण जर का आपण पाहिलं तर सणासुदीचं दिवस आहे, गणपती बाप्पा येत आहेत, दहीहंडीची प्रॅक्टिस सुरु आहे. हा सगळा विचार केल्यानंतर उद्याचा बंद हा दुपारी 2 वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा. अशी माझी विनंती आहे. अनेकांना उत्सव पण करायचे आहे, उत्साह आहे पण त्याच्यामध्ये अगदी उत्सवातसुद्धा आपली मुलीबाळी सुरक्षित राहतील की नाही. हासुद्धा प्रश्न त्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. सरकारला काहीही म्हणू दे. मी जनतेच्यावतीने करतो आहे. जनतेलासुद्धा आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे.
केवळ जनतेचं मत लोकसभेमध्ये किंवा निवडणुकीमध्ये वेळेलाच व्यक्त करता येत असं नाही. तर मधल्या काळामध्येसुद्धा जनतेनं मत व्यक्त केलं पाहिजे. जर काही यंत्रणा वेळेमध्ये हलली असती तर हा उद्रेक झाला नसता. ज्याला म्हणायचे आहे की हे सर्व आंदोलन राजकारणीने प्रेरित आहे मग उच्च न्यायालयाने याची स्वत:हून जी दखल घेतलेली आहे. तीसुद्धा राजकारणीने प्रेरित घेतलेली आहे का? उच्च न्यायालय स्वत:हून याची दखल घेत असेल तर जनतेलासुद्धा तो अधिकार असेल. जनतेचं न्यायालय हे वेगळं आहे. ज्यावेळेला सगळं रस्ते बंद होतात, तेव्हा जनतेच्या न्यायालयाचा दरवाजा उघडतो. आणि तो दरवाजा आता हलायला लागला आहे. तो उघडू नये म्हणून या यंत्रणांनी आपापली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली पाहिजे आणि ती पाडली जात नाही. याची जाणीव करुन देण्यासाठी उद्याचा हा बंद आहे. उद्याच्या बंदाचे यश अपयश राजकारणामध्ये मोजायचं कारण नाही आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, उद्याचा बंद कुठल्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही. हा जनतेच्या प्रत्येकाच्या मनातला, घरातला प्रश्न आहे. म्हणून लोकल आणि बस. मी सरकारला देखील विनंती करतो आहे की, आपल्यालासुद्धा मुलीबाळी आहेत, कुटुंब आहेत त्यांचा रक्षणासाठी तुम्ही अकार्यक्षम असलात तरी जनता सक्षम आहे. म्हणून उद्याचा बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका. बंद हा बंद असतो. मी नागरिकांना विनंती करतो आहे. स्वत:हून या बंदमध्ये सहभागी व्हा. दुकानदारानेसुद्धा त्यांनासुद्धा कुटुंब आहे त्यांचीसुद्धा मुलगी शाळेत जात असेल. दुकानदारांनासुद्धा दुकानं बंद ठेवायला काय हरकत आहे. दुपारी 2 वाजेपर्यंतच ठेवायचे आहे. स्वत:हून बंद पाळला पाहिजे. जर कोणाला त्यांच्या माताभगिनींपेक्षा त्यांचा व्यवसाय प्यारा असेल तर त्याला कोणी वाचवू शकत नाही. हे एका घटनेपुरतं मर्यादित नाही आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले.