Wardha: निम्न वर्धा प्रकल्प 505 मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती होणार; सुमित वानखेडेच्या मागणीला यश

Wardha: निम्न वर्धा प्रकल्प 505 मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती होणार; सुमित वानखेडेच्या मागणीला यश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, भाजपचे लोकसभा प्रमुख सुमित वानखेडे यांच्या मागणीला यश आले.
Published on

भूपेश बारंगे | वर्धा: वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पावर उभारण्यात येणाऱ्या 505 मेगावॅट क्षमतेच्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्प विकासासाठी, महाराष्ट्र सरकारच्या 'महानिर्मिती' आणि भारत सरकारच्या 'सतलज जल विद्युत निगम लिमिटेड'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, भाजपचे लोकसभा प्रमुख सुमित वानखेडे यांच्या मागणीला यश आले.

यावेळी 'महानिर्मिती' आणि 'सतलज जल विद्युत निगम लिमिटेड', तसेच जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्थानिक क्षेत्राच्या विकासासाठी महत्वापूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पामुळे जवळपास 1400 व्यक्तींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. निम्न (लोअर) वर्धा प्रकल्प हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी जवळील वरुड-धानोडी येथील वर्धा नदीवर असून, यावर प्रस्तावित असलेल्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्पाकरिता महानिर्मितीने पूर्ण व्यवहार्यता सर्वेक्षण केलेले असून त्यानुसार जवळपास 732 हेक्टर जलक्षेत्राची निवड केली जाणार आहे. तर विकासकामांसाठी जवळपास 3030 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून वार्षिक हरित ऊर्जा निर्मिती जवळपास 1051.28 दशलक्ष युनिट्स अपेक्षित असून 36 महिन्यांमध्ये या प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

राज्य सरकारने मान्य केलेल्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्पामुळे राज्यात सौरऊर्जा निर्मितीला चालना मिळेल आणि नूतनीकरण योग्य बंध पूर्ण करण्यास तर सौरऊर्जा प्रकल्प स्थापित क्षमतेचे आणि निर्मितीचे समतुल्य उत्सर्जन टाळून कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सहाय्यभूत ठरेल. या माध्यमातून पारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी महाग जीवाश्म इंधन खरेदी टाळता येईल तर प्रस्तावित 505 मेगावॅटची स्थापित क्षमतेला लक्षात घेत, वार्षिक सीओ२ उत्सर्जन जवळपास 862049 टन कमी होईल तर वार्षिक कोळशाचाही वापर जवळपास 849434 टनाने कमी करण्याकरिता मदत मिळणार आहे. 49/51 अशा समभागाने या प्रकल्पाकरिता 'सतलज जल विद्युत निगम लिमिटेड' आणि 'महानिर्मिती' यांच्यामध्ये करार करण्यात आलेला आहे.

आर्वी तालुक्यातील धानोडी येथील लोअर वर्धा प्रकल्पावर 505 मेगा वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पास राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. भारत सरकारची कंपनी सतलज जलविद्युत निगम व महाराष्ट्र सरकारची कंपनी महानिर्मिती संयुक्तपणे 3030 कोटींची गुंतवणूक करून प्रकल्प उभारणार, स्थानिक क्षेत्राचा विकास करण्यास सक्षम असलेल्या या प्रकल्पातून 1400 व्यक्तींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळणार आहे असे सुमित वानखेडे, भाजप लोकसभा प्रमुख म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com